भारतातील बालविवाहांत घट;
युनिसेफचा अहवाल
प्रमाण ४७ वरुन २७ टक्क्यांवर
जगभरात बालविवाहांच्या संख्येत झपाट्याने घट झाली असून मागच्या दशकात ही संख्या वेगाने कमी झाल्याचे युनिसेफने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. २. ५ कोटी बालविवाहांवर प्रतिबंध घालण्यात यश आल्याचे युनिसेफचे म्हणणे आहे. हे प्रमाण कमी होण्यामध्ये दक्षिण आशियातील देशांमध्ये भारत आघाडीवर असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भारताच्यादृष्टीने ही अतिशय आनंदाची बाब आहे.
भारतात किशोरवयीन लोकसंख्येपैकी २० टक्क्यांहून अधिक किशोरवयीन भारतात आहेत. त्यातही दक्षिण आशियामध्ये बालविवाह होण्याचे प्रमाण जास्त आहे. असे युनिसेफच्या बालसंरक्षण विभागाचे प्रमुख जावियर एग्लिवार यांनी सांगितले आहे. मागील दशकात १८ वर्षाच्या आधी लग्न होणाऱ्या मुलींचे प्रमाण भारतात जवळपास ४७ टक्के होते. हे प्रमाण आता कमी झाले असून २७ टक्क्यांपर्यंत आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बालविवाहामुळे महिलांचे शिक्षण, आरोग्य, सामाजिक स्थान या सगळ्यांवर गदा येत असल्याचेही अनेक अभ्यासातून समोर आले आहे.
भारतात लग्नासाठी मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ आहे. बालविवाहाच्या संदर्भात कडक कायदेही आहेत. भारतात बालविवाह लावल्यास त्या मुलाच्या किंवा मुलीच्या पालकांना १ लाख रुपये दंड आणि २ वर्षांचा कारावास भोगावा लागू शकतो. मात्र भारतीय समाजात बालविवाह मोठ्या प्रमाणात रुढ झालेला असल्याने कायद्याचा विचार न करता सर्रास बालविवाह लावले जातात. परंतु याचे प्रमाण मागील काही काळात कमी झाले आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा